राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी
Rashtrapita Mahatama Gandhi Punyatithi
30 जानेवारी 2022
✴️भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले उमेदीचे संपूर्ण आयुष्य वेचले , अशा थोर नेत्यांमध्ये महात्माजींचे स्थान वैशिष्टयपूर्ण आहे . इंग्रजी राज्याला विरोध करण्यासाठी अनेकांनी अनेक मार्ग स्विकारले कोणी शस्त्र बळाने तर कोणी शब्दबळाने इंग्रज सत्ताधीशांना विरोध केला . पण महात्मा गांधींनी सत्याग्रहाने व अहिंसेने इंग्रजांना नमविले . त्यासाठी जनमत तयार करण्यावर त्यांचा भर होता . समाजात जी जागृती निर्माण केली. त्यात देशाभिमान आणि त्याग यांना महत्व होते. त्यांनी स्वत : चे जीवनच त्या दृष्टीने घडविले होते. भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असेच महात्मा गांधी यांना म्हणता येईल. म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता असा दर्जा देण्यात आला आहे .
✴️मोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते.
✴️आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्माजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1969 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. सन. 1888 मध्ये ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी बॅरीस्टर ही पदवी मिळवली. सन. 1891 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिलीला सुरवात केली. पण आयुष्यात एक वळण अचानक असे आले की ते दक्षिण आफ्रिकेत गेले. तेथे जाऊन वकिली करू लागले. तेथेही ते योगायोगानेच तेथील भारतीयांच्या अधिकाराच्या आंदोलनात ओढले गेले. पुढे या आंदोलनाचे नेतृत्व करून त्यांनी अहिंसात्मक आंदोलनाद्वारे आपले हक्क मिळविण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवला. सत्याग्रहाचा प्रयोगही त्यांनी तेथेच केला. तेथेच त्यांनी 1903 मध्ये इंडियन ओपीनियन नावाचे वृत्तपत्र काढले. सत्याग्रह शिबिराची स्थापनाही त्यांनी तेथे केली.
✴️सन. 1914 मध्ये ते भारतात परतले. ते महात्मा म्हणून विख्यात झाले. 1917 मध्ये त्यांनी चंपारण येथील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आंदोलन केले . पुढे 1920-22 मध्ये अहिंसक असहकार आंदोलन , 1930-32 दरम्यान दांडी येथील मीठाचा सत्याग्रह आणि सविनय कायदेभंग, 1940-42 दरम्यान व्यक्तिगत सत्याग्रह आणि 1942 चे भारत छोडो आंदोलन केले. 9 ऑगस्ट 1942 ला त्यांनी मुंबईत करा किंवा मरा असे आवाहन जनतेला केले. त्यानंतर त्यांना अटक झाली. त्यांना पुण्यात आगाखान पॅलेस येथे ठेवण्यात आले. तेथे 6 मे 1944 ला त्यांना सोडण्यात आले. त्यांनी अनेकदा उपोषणाचा मार्ग अवलंबून ब्रिटिश सरकारला जेरीला आणले. महात्मा गांधी केवळ राजकारणीच नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता.
✴️इंडियन ओपिनियन मध्ये गांधीजींनी लिहिले आहे .... 'व्यक्तीचा प्रमुख संघर्ष आतून असतो . ती आतील शक्ती प्रेरणा देत असते . हे कार्य वर्तमानपत्र चांगल्या प्रकारे करू शकतात . एका पत्रकाराच्या रूपाने त्यांनी सामाजिक , आर्थिक व राजकीय विचार मांडले, त्यामुळे तत्कालीन बुद्धिमंत वर्गाने म्हणजे वकील , शिक्षक , विद्यार्थी , पत्रकार , ट्रेड युनियनचे नेते आदींनी गांधीजींना आपले प्रेरणास्थान मानले . त्यांनी सुरू केलेल्या ' हरीजन ' वृत्तपत्राचा उद्देशच ग्रामीण भागातील लोकांचे भले करणे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुधारणा करणे हाच होता. सामाजिक सुधारणा, शिक्षणपर लेखांच्या शिवाय गांधीजींच्या वर्तमानपत्रात आगामी राजकीय कार्यक्रम, रणनीती यांचेही विवरण असायचे. प्रख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईनने गांधीजींच्या बाबतीत एकदा म्हटले होते. असा कुणी माणूस या धरतीवर निर्माण झाला होता. यावर येणारी पिढी क्वचितच विश्वास ठेवेल . महात्मा गांधीच्या व्यक्तिमत्वाने, आचरणाने, शिकवणुकीने आणि प्रत्यक्ष कार्याने प्रभावित झालेली जनता स्वातंत्र्योत्सुक बनली. हि निश्चिती झाल्यावर गांधीजींनी इंग्रजांना 'चले जाव' असे ठणकावून सांगितले. या घोषणेने संपूर्ण भारतात एक मोठी चळवळ निर्माण झाली.
✴️गांधीजींसह अनेक थोर नेते सरकारने तुरुंगात पाठविले. पण जनतेने माघार घेतली नाही उलट हे आंदोलन तीव्र केले. ठिकठीकाणी धरपकड, लाठीमार, गोळीबार करून इंग्रजांनी हि चळवळ दडपण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अखेर इंग्रजांना 1947 मध्ये भारत सोडून जावेच लागले आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. सत्याग्रही गांधीजींच्या विचारात केवळ माणुसकी, शब्द पाळणे, अहिंसात्मक लढा देणे, यांना महत्व होते. काहींना हे विचार पटत नव्हते . देशाची फाळणी झाली ती अश्या गुळगुळीत धोरणांनीच ; अशी समजूत असलेल्यांनीच गांधींच्या विचारांचा निषेध केला. आणि या वैचारिक संघर्षातून महात्माजींची 30 जानेवारी 1948 रोजी हत्या करण्यात आली. मृत्यूसमयी त्यांच्या मुखातून 'हे राम' हे उद्दगार काढून त्यांनी हे जग सोडले. गांधीजींनी आपले आयुष्य सत्याच्या शोधासाठी अर्पण केले होते. त्यांचे आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग या नावाखाली प्रसिद्ध आहे. गांधीजींनी म्हटले आहे की, सर्वांत महत्त्वाची लढाई ही स्वतःच्या वाईट प्रवृत्ती, भय आणि असुरक्षितता यांच्यावर मात करणे ही होय. ' परमेश्वर सत्य आहे " असे त्यांचे मत होते. पुढे त्यांनी ते " सत्य ( हेच ) परमेश्वर आहे' असे बदलले. त्यांच्या महान देशकार्य व त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करून , त्यांनी घालून दिलेली सत्य व अहिंसेची तत्वे जीवनात प्रत्यक्षरीत्या आचरणात आणून , त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण सर्वांनी , आपल्या हातून समाजाची , राष्ट्राची व देशाची सेवा घडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करूयात .
🙏 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !!!! 💐🙏
0 Comments