वसंत कानेटकर - मराठी साहित्यिक नाटककार

 
ओळख मराठी साहित्यिकांची

साहित्यिक - नाटककार वसंत कानेटकर 

Vasant Kanetakar 

📲 नाटककार वसंत कानेटकर यांच्या जीवन कार्यावर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषा चाचणी सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈 

🔻पूर्ण नाव - वसंत शंकर कानेटकर

🔻जन्म - २० मार्च इ.स. १९२२, रहिमतपूर जि . सातारा

🔻मृत्यू - ३१ जानेवारी  इ.स. २००१, नाशिक

🔻कार्यक्षेत्र - नाटककार, लेखक

🔻साहित्य प्रकार - नाटके, कादंबऱ्या

🔻वडील - शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश )

✴️ कानेटकरांचा जन्म मार्च २०, इ.स. १९२२ रोजी सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे झाला. मराठी भाषेतील कवी गिरीश त्यांचे वडील होते. नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांचे अखेरपर्यंत वास्तव्य नाशिक येथील ‘शिवाई’ बंगला येथे होते. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच.पी.टी. महाविद्यालयात (हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालयात) ते प्राध्यापक होते.

✴️वसंत कानेटकर हे लोकप्रिय मराठी नाटककार, लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील, कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर या गावी झाला. ते चार भावंडांपैकी दुसरे होते. प्रसिद्ध कवी शंकर केशव कानेटकर हे त्यांचे वडील. ते “गिरीश” या टोपणनावाने महाराष्ट्रात ओळखले जात.

✴️ १९४६ मध्ये कानेटकर नाशिकमधील गोखले एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या एच. पी. टी. आर्टस् कॉलेजमध्ये मराठी व इंग्रजीचे व्याख्याते म्हणून रुजू झाले. पुढे त्यांना प्राध्यापक म्हणून बढती मिळाली आणि या संस्थेचे ते आजीव सदस्यदेखील झाले. शिकवत असतानाच त्यांनी लघुकथा लेखक आणि कादंबरीकार म्हणून आपली लेखन कारकीर्द सुरू केली. मनोहर आणि सत्यकथा यांसारख्या नियतकालिकांमधून त्यांनी लिहिलेल्या लघुकथा प्रसिद्ध झाल्या.  १९५० ते १९५७ याकाळात त्यांच्या घर, पंख आणि पोरका या तीन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या.

✴️१९५७ मध्ये कानेटकरांनी आपले पहिले नाटक वेड्याचे घर उन्हात लिहिले. हे नाटक भालबा केळकर यांनी दिग्दर्शित केले, तर पुण्यातील प्रोग्रेसिव्ह ड्रामाटिक असोसिएशनने त्याची निर्मिती केली. नाटकातील मध्यवर्ती भूमिका श्रीराम लागू यांनी निभावली होती.

✴️ कानेटकरांनी रायगडाला जेव्हां जाग येते या ऐतिहासिक नाटकात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यातील पिता-पुत्राच्या संबंधांचे अंतरंग मांडले. या नाटकाच्या लेखनतयारीसाठी त्यांना दोन वर्षे लागली. त्यांनी स्वतः रायगड किल्ल्याला भेट दिली, इतिहासकार सेतुमाधवराव पगडी आणि शाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी चर्चा केल्या, ऐतिहासिक नोंदी वाचल्या. ऐतिहासिक मराठी भाषा अंगवळणी पडण्यासाठी प्राध्यापक म्हणून बखरदेखील शिकवायला घेतली. हे नाटक मराठी रंगभूमीवर एक मैलाचा दगड ठरले. या नाटकातील काशिनाथ घाणेकर यांची संभाजी महाराजांची भूमिका विशेष गाजली.

✴️ कानेटकरांचे पुढचे नाटक अश्रूंची झाली फुले हे त्यांचे सर्वांत यशस्वी नाटक. हे एक सामाजिक, भावनाप्रधान नाटक होते. या नाटकाची निर्मिती व दिग्दर्शन प्रभाकर पणशीकर यांनी केले, तसेच त्यांनी या नाटकात “प्रा.विद्यानंद” ही मुख्य भूमिकादेखील निभावली. चित्तरंजन कोल्हटकर यांची “शंभू महादेव” आणि काशिनाथ घाणेकर यांची “लाल्या” या भूमिका विशेष गाजल्या.

✴️ कानेटकर यांच्या प्रेमा, तुझा रंग कसा?, प्रेमाच्या गावा जावे, लेकुरे उदंड जाली, मदनबाधा, छू मंतर! आणि सूर्याची पिल्ले इत्यादी हलक्याफुलक्या विनोदी सुखात्मिका अत्यंत लोकप्रिय ठरल्या. शेक्सपियरच्या नाटकांचा कानेटकरांवर विशेष प्रभाव होता.

✴️ १९७१ मध्ये ते कुर्ला, मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. १९७७ मध्ये त्यांना कस्तुरीमृग या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट नाटक व सर्वोत्कृष्ट नाटककार असे कलादर्पण पुरस्कार मिळाले. त्यांना संगीत नाटक अकादमीने सर्व भारतीय भाषांमधील सर्वोत्कृष्ट नाटककार म्हणून गौरविले आहे (१९८४). ठाणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली (१९८८). त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र गौरव (१९९०) आणि भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले (१९९२).

✴️ कानेटकरांनी ४३ नाटके व ४ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांची नाटके व्यावसायिकदृष्ट्या खूप यशस्वी झाली.

✴️ वसंत कानेटकरांनी हिराबाई पेडणेकर यांच्या जीवनावर कस्तुरीमृग, बाबा आमटे यांच्या जीवनावर वादळ माणसाळतंय, इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांच्या जीवनावर विषवृक्षाची छाया आणि महर्षी कर्वे आणि बायो यांच्या जीवनावर हिमालयाची सावली ही नाटके लिहिली.

✴️ वसंत कानेटकर यांचा गौरव - 

🔸अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, ठाणे, इ.स. १९८८

🔸वसंत कानेटकर यांच्या नावाने रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे वसंत कानेटकर स्मृति पुरस्कार दिला जातो.

✴️पुरस्कार

🔸इ.स. १९६६ साली सर्वोत्कृष्ट कथेसाठी फिल्मफेअर पुरस्कार ( हिंदी चित्रपटः आँसू बन गये फूल, मूळ मराठी नाटकः अश्रूंची झाली फूले)

🔸इ.स. १९९२मध्ये पद्मश्री पुरस्कार 



Post a Comment

0 Comments