ओळख कर्तृत्ववान भारतीय महिलांची - डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी
Doctor Aanandibai Joshi
The first Indian woman Doctor Aanandibai Joshi
✴️ जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने थोर व कर्तृत्ववान भारतीय महिलांच्या जीवन कार्याची ओळख करून देण्यासाठी - ओळख कर्तृत्ववान भारतीय महिलांची हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत दररोज एका भारतीय कर्तृत्ववान महिलेची ओळख व त्यांच्या जीवन कार्यावर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषा घेतली जाणार आहे. या प्रश्नमंजुषा चाचणीत विद्यार्थी , पालक व शिक्षक या सर्वांनी सहभाग घ्यावा.
पहिल्या भारतीय महिला डॉक्टर
आनंदीबाई गोपाळराव जोशी
The first Indian female doctor
Dr. Aanandibai Gopalrao Joshi
🔻जन्म - ३१ मार्च, १८६५, पुणे, महाराष्ट्र
🔻मृत्यू - २६ फेब्रुवारी, १८८७ (वय २१), पुणे
🔻मृत्यूचे कारण - क्षयरोग
🔻शिक्षण - एम.डी.
🔻प्रशिक्षणसंस्था - विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया
🔻पेशा - वैद्यकीय
🔻ख्याती - भारतातील पहिल्या महिला डॉक्टर
🔻पती - गोपाळराव जोशी
✴️ आनंदीबाई गोपाळराव जोशी या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या.
✴️ आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च, १८६५ रोजी पुण्यात त्यांच्या आजोळी झाला. यांचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका येथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. गोपाळराव जोशी हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रहिवासी होते. लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले. वयाच्या चौदाव्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला, परंतु वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे मूल फक्त दहा दिवस जगले. आनंदीबाईंच्या जीवनात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या घटनेनंतर त्यांनी डॉक्टर होण्याचे ठरविले. गोपाळरावांनी तिला मिशनरी शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न केला. जोशी यांनी कलकत्त्याला बदली घेतल्यावर तेथे आनंदीबाई संस्कृत आणि इंग्लिश वाचणे आणि बोलणे शिकल्या.
✴️ आनंदीबाईंच्या वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत गोपाळरावांनी अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती आणि धर्मांतर करणे तर यांना मान्य नव्हते. पुढे गोपाळरावांची चिकाटीमुळे आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता १८८३ मध्ये, वयाच्या एकोणिसाव्या वर्षी विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनियामध्ये प्रवेश मिळाला. तेथे गेल्यानंतर अमेरिकेतील नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती. परंतु अमेरिकेतील कारपेंटर जोडप्याचे साहाय्य त्यांना लाभले.
✴️ कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम दोनच वर्षांत पूर्ण करून मार्च इ.स. १८८६ मध्ये आनंदीबाईनी एम.डी. ची पदवी मिळवली. एम.डी.साठी त्यांनी ‘‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’‘ या विषयावर प्रबंध लिहिला. एम.डी. झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडून त्यांचे अभिनंदन झाले. हा प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता. तिच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः अमेरिकेत गेले होते. पंडिता रमाबाई यांनीसुद्धा या समारंभात भाग घेतला. एम.डी. झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात आल्यावर त्यांना कोल्हापूरमधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधील स्त्री-कक्षाचा ताबा देण्यात आला.
✴️ वयाच्या विशीतच त्यांना क्षयरोग झाला होता. पुढे काही महिन्यातच म्हणजे २६ फेब्रुवारी, इ.स. १८८७ रोजी त्यांना पुण्यात मृत्यू आला.
केवळ २१ वर्षाच्या जीवनयात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. दुदैवाने आनंदीबाईंच्या बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही. मात्र 'चूल आणि मूल' म्हणजेच आयुष्य असे समजणाऱ्या महिलांना त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी आदर्श व मानदंड घालून दिला. एकीकडे सावित्रीबाई व ज्योतिबा फुले स्त्रीशिक्षणासाठी प्रयत्न करत असतानाच आनंदी-गोपाळ हे जोडपे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी झटत होते. जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही मोठे काम अशक्य नाही हे या जोडप्याने समाजाला सिद्ध करून दाखवले आहे असे म्हणता येऊ शकेल.
✴️ आनंदीबाई यांच्या जीवनाचा आढावा घेणारा "आनंदी गोपाळ" हा मराठी चित्रपट फेब्रुवारी २०१९मधे प्रदर्शित झाला. दिग्दर्शक समीर विद्वांस. या चित्रपटाला पुणे फिल्म फाऊंडेशन आणि राज्य सरकार यांच्यातर्फे जानेवारी २०२०मध्ये आयोजित केलेल्या १८व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मराठी विभागात पहिला पुरस्कार मिळाला आहे.
🙏 स्रोत - विकिपीडिया
0 Comments