राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती
26 जून 2022
शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.
१८९६ चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे उतरले. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता 'असा राजा होणे नाही' असेच प्रजेला वाटते. ‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.
स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात 'महाराजांचे महाराज' असा गौरव होतो. रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले. त्यांच्या कार्याचा गौरव समकालीन लेखकांनी व इतिहासकारांनी केलेला आहे.
महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उध्दार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रिडा व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले.
त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे 'डेक्कन रयत असोसिएशन' ही संस्था स्थापली.
💥 बी.ए. लठ्ठे यांनी १९२६मध्ये शाहूंचे इंग्रजीतील पहिले चरित्र लिहिले. त्याचे मराठी भाषांतरही प्रकाशित करण्यात आले.
शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. त्यादिवशी सार्वजनिक कार्यक्रम होतात .
कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे 'राजर्षी पुरस्कार' रोख एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या स्वरुपात दिला जातो.

0 Comments