ShivRajyabhishek Day. शिवराज्याभिषेक दिन

 


शिवराज्याभिषेक सोहळा दिवस

       हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी 6 जून रोजी किल्ले रायगडावर साजरा करण्यात येतो.
'हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा' या एकाच ध्यासाने संपूर्ण जीवन व्यापलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे. त्यामुळे हा दिवस सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो.
    महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पंडित नेहरू आपल्या डिस्कवरी ऑफ इंडिया (भारताचा शोध) या ग्रंथात म्हणतात : "छत्रपती शिवाजी प्रतिहल्ला करणाऱ्या हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक होते. जुन्या इतिहासातून त्यांनी प्रेरणा मिळविली. महाराज अत्यंत धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण असणारे नेते होते. त्यांनी स्वराज्यासाठी चिवटपणे लढणारा गट म्हणून मराठी जनांना एकत्र केले, त्यांच्यामागे राष्ट्रीयत्वाची पार्श्वभूमी उभी केली आणि या गटास अशी चेतना दिली की या गटाशी धडका घेत मुघल साम्राज्य अखेर मोडकळीस आले. 
  छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती खालीलप्रमाणे-
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते"
    ६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. या शिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला, फारसी-संस्कृत शब्दकोश बनवला गेला.
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वभावातील सहिष्णुता,  दूरदृष्टी, करारीपणा व धाडसी वृत्ती अशी काही वैशिष्ट्ये शिवाजी महाराजांची सांगता येतील. शिवाजी महाराजांच्या अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात.
      छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर सुरू झाली होती. राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्ववानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते. चार महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. रोज त्यांना मिष्ठान्नाचे जेवण असे. सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती. दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात शिवाजी महाराज गढून गेले होते. राजे शिवाजी यांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला. त्यांचे आशीर्वाद घेतले.

त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरांत जाऊन देवर्शन केले. देवके दर्शन घेतले, पूजा केली आणि ते रायगडाला १२ मे १६७४ला परत आले. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते. म्हणून चार दिवसांनी ते प्रतापगडवरील प्रतिष्ठापना केलेल्या भवानीमाता देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. २१ मेला पुन्हा रागयगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले. महाराजांनी २८ मे ला प्रायश्चित्त केले जानवे परिधान केले. दुसऱ्या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला. त्यावेळी गागाभट्टांना ७००० होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळून १७००० होन दक्षिणा दिली.

दुसऱ्या दिवशी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, गुळ, फळे इत्यादींच्या तुला झाल्या.

६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बालसंभाजीराजे थोडेसे मागे बसले होते. अष्टप्रधानांतील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी शिवाजीमहाराजांबर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजी महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली.मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.

राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. सभासदबखर म्हणते त्याप्रमाणे ३२ मण सोन्याचे (१४ लाख रुपये मूल्य असलेले) भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते.. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. प्रजेनी महाराजाना आशीर्वाद दिला. ’शिवराज की जय’ शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला. राजे शिवाजी महाराजांनी सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. त्यांनी एकून सोळा प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रिगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तिपत्रे, धन, घोडे, हत्ती,रत्ने,वस्त्रे,शस्त्रे दान केली. हे सर्व सकाळी आठ वाजेपर्यंत संपले. समारंभ संपल्यावर, शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सेन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुर, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.
         यंदा राज्य सरकार महाराष्ट्रभर शिवस्वराज्य दिन साजरा करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींसमोर स्वराज्य गुढी उभारून हा दिवस साजरा करणार आहे. यावेळी जरतरी पताक्यावर शिवाजी महाराजांच्या पाच शुभलक्षणांचा समावेश असलेला झेंडा फडकवला जाणार आहे. 
   अवघ्या हिंदुस्थानाचे प्रेरणास्थान
छत्रपती शिवाजी महाराज यांना
शिवराज्याभिषेक दिनी
मानाचा मुजरा!
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!! 💐💐🙏

        

Post a Comment

0 Comments