Mahatma Gandhi Jayanti
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती
2 ऑक्टोबर
💢 महात्मा गांधी जयंती निमित्त विशेष प्रश्नमंजुषा चाचणी सोडविण्यासाठी 👈 येथे क्लिक करा.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले उमेदीचे संपूर्ण आयुष्य वेचले , अशा थोर नेत्यांमध्ये महात्माजींचे स्थान वैशिष्टयपूर्ण आहे . इंग्रजीराज्याला विरोध करण्यासाठी अनेकांनी अनेक मार्ग स्विकारले कोणी शस्त्र बळाने तर कोणी शब्दबळाने इंग्रज सत्ताधीशांना विरोध केला . पण महात्मा गांधींनी सत्याग्रहाने व अहिंसेने इंग्रजांना नमविले . त्यासाठी जनमत तयार करण्यावर त्यांचा भर होता . समाजात जी जागृतीनिर्माण केली त्यात देशाभिमान आणि त्याग यांना महत्व होते . त्यांनी स्वत : चे जीवनच त्या दृष्टीने घडविले होते . भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असेच महात्मा गांधी यांना म्हणता येईल . म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता असा दर्जा देण्यात आला आहे .
आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्माजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1969 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला . 1888 मध्ये ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले . तेथे त्यांनी बॅरीस्टर ही पदवी मिळवली . 1891 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिलीला सुरवात केली . पण आयुष्यात एक वळण अचानक असे आले की ते दक्षिण आफ्रिकेत गेले . तेथे जाऊन वकिली करू लागले . तेथेही ते योगायोगानेच तेथील भारतीयांच्या अधिकाराच्या आंदोलनात ओढले गेले . पुढे या आंदोलनाचे नेतृत्व करून त्यांनी अहिंसात्मक आंदोलनाद्वारे आपले हक्क मिळविण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवला . सत्याग्रहाचा प्रयोगही त्यांनी तेथेच केला . तेथेच त्यांनी 1903 मध्ये इंडियन ओपीनियन नावाचे वृत्तपत्र काढले . सत्याग्रह शिबिराची स्थापनाही त्यांनी तेथे केली.
1914 मध्ये ते भारतात परतले . ते महात्मा म्हणून विख्यात झाले . 1917 मध्ये त्यांनी चंपारण येथील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आंदोलन केले . पुढे 1920-22 मध्ये अहिंसक असहकार आंदोलन , 1930-32 दरम्यान दांडी येथील मीठाचा सत्याग्रह आणि सविनय कायदेभंग , 1940-42 दरम्यान व्यक्तिगत सत्याग्रह आणि 1942 चे भारत छोडो आंदोलन केले . या साम्यत महात्माजींचे नेतृत्व झळाळून उठले . 9 ऑगस्ट 1942 ला त्यांनी मुंबईत करा किंवा मरा असे आवाहन जनतेला केले . त्यानंतर त्यांना अटक झाली . त्यांना पुण्यात आगाखान पॅलेस येथे ठेवण्यात आले . तेथे 6 मे 1944 ला त्यांना सोडण्यात आले . त्यांनी अनेकदा उपोषणाचा मार्ग अवलंबून ब्रिटिश सरकारला जेरीला आणले . महात्मा गांधी केवळ अट्टल राजकारणीच नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता . ते चांगले समाज सुधारक , कुशल अर्घज्ज्ञ होते . याबरोबरच त्यांचा उत्कृष्ट जनसंपर्क होता . ज्यावेळी मुद्रण माध्यम इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते , अशा वेळी गांधीजींनी आपल्या विचारांची लाट गावागावात आणि शहराशहरात पोहचवली. त्यांच्या सरळ , साध्या व सोप्या भाषेचा प्रभाव लाखो लोकांवर पडत असे .
इंडियन ओपिनियन मध्ये गांधीजींनी लिहिले आहे .... ' व्यक्तीचा प्रमुख संघर्ष आतून असतो . ती आतील शक्ती प्रेरणा देत असते . हे कार्य वर्तमानपत्र चांगल्या प्रकारे करू शकतात . एका पत्रकाराच्या रूपाने त्यांनी सामाजिक , आर्थिक व राजकीय विचार मांडले , त्यामुळे तत्कालीन बुद्धिमंत वर्गाने म्हणजे वकील , शिक्षक , विद्यार्थी , पत्रकार , ट्रेड युनियनचे नेते आदींनी गांधीजींना आपले प्रेरणास्थान मानले . त्यांनी सुरू केलेल्या ' हरीजन ' वृत्तपत्राचा उद्देशच ग्रामीण भागातील लोकांचे भले करणे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुधारणा करणे हाच होता . सामाजिक सुधारणा , शिक्षणपर लेखांच्या शिवाय गांधीजींच्या वर्तमानपत्रात आगामी राजकीय कार्यक्रम , रणनीती यांचेही विवरण असायचे . प्रख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईनने गांधीजींच्या बाबतीत एकदा म्हटले होते . असा कुणी माणूस या धरतीवर निर्माण झाला होता . यावर येणारी पिढी क्वचितच विश्वास ठेवेल . महात्मा गांधीच्या व्यक्तिमत्वाने , आचरणाने , शिकवणुकीने आणि प्रत्यक्ष कार्याने प्रभावित झालेली जनता स्वातंत्र्योत्सुक बनली . हि निश्चिती झाल्यावर गांधीजींनी इंग्रजांना ' चले जाव ' असे ठणकावून सांगितले . या घोषणेने संपूर्ण भारतात एक मोठी चळवळ निर्माण झाली.
गांधीजींसह अनेक थोर नेते सरकारने तुरुंगात पाठविले . पण जनतेने माघार घेतली नाही उलट हे आंदोलन तीव्र केले . ठिकठीकाणी धरपकड , लाठीमार , गोळीबार करून इंग्रजांनी हि चळवळ दडपण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अखेर इंग्रजांना 1947 मध्ये भारत सोडून जावेच लागले आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला . सत्याग्रही गांधीजींच्या विचारात केवळ माणुसकी , शब्द पाळणे , अहिंसात्मक लढा देणे , यांना महत्व होते . काहींना हे विचार पटत नव्हते . देशाची फाळणी झाली ती अश्या गुळगुळीत धोरणांनीच ; अशी समजूत असलेल्यांनीच गांधींच्या विचारांचा निषेध केला . आणि या वैचारिक संघर्षातून महात्माजींची 30 जानेवारी 1948 रोजी हत्या करण्यात आली . मृत्यूसमयी त्यांच्या मुखातून ' हे राम ' हे उद्गार काढून त्यांनी हे जग सोडले . गांधीजींनी आपले आयुष्य सत्याच्या शोधासाठी अर्पण केले होते . त्यांचे आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग या नावाखाली प्रसिद्ध आहे . गांधीजींनी म्हटले आहे की , सर्वांत महत्त्वाची लढाई ही स्वतःच्या वाईट प्रवृत्ती , भय आणि असुरक्षितता यांच्यावर मात करणे ही होय . ' परमेश्वर सत्य आहे " असे त्यांचे मत होते . पुढे त्यांनी ते " सत्य ( हेच ) परमेश्वर आहे ' असे बदलले . त्यांच्या महान देशकार्य व त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करून , त्यांनी घालून दिलेली सत्य व अहिंसेची तत्वे जीवनात प्रत्यक्षरीत्या आचरणात आणून , त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण सर्वांनी , आपल्या हातून समाजाची , राष्ट्राची व देशाची सेवा घडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करूयात .
🙏 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!!! 💐🙏

0 Comments