स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी
Svatantravir Savarkar Punyatithi
🙏 स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !!! 🙏💐💐
📲 स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी निमित्त विशेष प्रश्नमंजुषा चाचणी सोडविण्यासाठी येथे क्लिक करा 👈
🔻जन्म: - २८ मे १८८३, भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र
🔻मृत्यू: - २६ फेब्रुवारी १९६६, दादर, मुंबई, महाराष्ट्र
🔻चळवळ: - भारतीय स्वातंत्र्यलढा
🔻संघटना: - अभिनव भारत, अखिल भारतीय हिंदू महासभा
🔻प्रमुख स्मारके: - मुंबई, पुणे, बिहार, दिल्ली, अंदमान
🔻वडील: - दामोदर विनायक सावरकर
🔻आई: - राधाबाई दामोदर सावरकर
✴️ विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते. १९३८ च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 'हिंदुत्व' या संकल्पनेचे प्रणेते असून सर्वसमावेशक हिंदुत्व मांडणारे होते.
✴️ भाषाशुद्धीचा आग्रह धरून सावरकरांनी मराठी भाषेला ४५ शब्द दिले आहेत.
✴️ सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या शहरात झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव सावरकर हे धाकटे भाऊ होते. सावरकरांची आई, ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील इ.स. १८९९च्या प्लेगला बळी पडले.
✴️ सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली. मार्च, इ.स. १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर इ.स. १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व इ.स. १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.
✴️ राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले.
✴️ लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती. लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य.
✴️ इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले.
✴️ स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.
अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते.अंदमानमध्ये असताना सावरकरांनी Essentials of Hindutva हा ग्रंथ लिहिला.
✴️ रत्नागिरीत सावरकर सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते. इ.स. १९३७ पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रॉयल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला.
✴️ वीर सावरकरांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या "सागरा प्राण तळमळला", "हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", "जयोस्तुते", "तानाजीचा पोवाडा" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.'सागरा प्राण तळमळला' या कवितेला २००९ साली १०० वर्षे पूर्ण झालेली आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ४१ पुस्तकांचा संच बाजारात उपलब्ध आहे.
✴️ वि.दा. सावरकर हे मुंबई येथे इ.स. १९३८ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
✴️ सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. इ.स. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. १ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.
0 Comments